अमरावतीत काही आठवड्यांपूर्वी डेल्टा विषाणू निर्माण झाल्याने खळबळ उडाली. राज्यात नुकतेच डेल्टा प्लस विषाणूचे (Corona Delta Plus Variant) २१ रुग्ण आढळले. मात्र आश्चर्यकारक बाब म्हणजे या डेल्टा प्लस विषाणूची बाधा झालेल्या २१ रुग्णांमध्ये एकही रुग्ण विदर्भातील नाही.
या विषाणूचा प्रादुर्भाव सध्या कोकण परिसरात दिसत आहे. डेल्टा प्लस विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून साडेसात हजार नमुने पाठवण्यात आले होते. यातील २१ रुग्णांना या विषाणूची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी रात्री उशिरा माहिती दिली होती
देशात काय आहे स्थिती?
भारतात आतापर्यंत करोना विषाणूच्या ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’चे ४० हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यातील सर्वाधिक प्रकरणं महाराष्ट्रातून समोर आली आहेत.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अद्याप डेल्टा प्लस ‘व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट’ अर्थात ‘उत्परिवर्तन अवस्थेत’ आहे. करोना व्हायरसचं डबल म्युटेशन सर्वात अगोदर महाराष्ट्रात आढळून आलं होतं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, डेल्टा प्लस व्हेरियंट रुग्णांच्या रोग प्रतिकारशक्तीला चकवा देऊ शकतो. भारतात सर्वात अगोदर आढळून आलेल्या ‘डेल्टा व्हेरियंट’मध्ये बदल होऊन ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’ तयार झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.